॥ पं.हं. श्री देविदास बाबा स्तोत्र॥
श्री पंढरीदास कृत
पं.हं. श्री देविदास बाबा स्तोत्र
॥ श्री गणेशाय नमः ॥
श्री पंढरीदास कृत
पं.हं. श्री देविदास बाबा स्तोत्र
॥ श्री गणेशाय नमः ॥
ॐ. नमो “श्री” आद्येश्वरा | सगुण निर्गुण सर्वेश्वरा |
सर्व मान्या परमेश्वरा | कृपाकरा, कृपावंता ॥१॥
संत साहित्यिक सेवाव्रत | चालवी दासाचे अविरत |
अथ, एवम, दयाळा सतत | दास पंढरीश, विनवी ॥२॥
साहित्य सेवा सेवाची खरी । जेणे सन्मार्गी लागावे नरनारी ।
तेणे जनता जनार्दन सत्वरी । प्रसन्न होई-तातडीने ॥३॥।
तुजसी कधीही शोधिता शोधिता । संता माजीची लाभतो हाता ।
म्हणूनिया, आता अन्य कोणता । भक्ती मार्ग-नाही नाही ॥४॥
संत गजानन शेगांवीचे । अथवा मुंगसाजी धामणगांवीचे ।
राष्ट्रसंत गुरुकुंजाश्रमीचे | सर्व श्रेष्ठ-उदाहरण ॥५॥
माऊली ज्ञानराज तुकाराम । सेनाजी, नगाजी, जलाराम ।
संत सखू, पुंडलीक बाबा परशराम। कल्याणार्थ-येती जाती ॥६॥
सदाचारी, परोपकारी व्यक्ती । तिच मानवता जीती जागती ।
आपण तरुनी जना तारिती | तेची असती ज्येष्ठ संत ॥७॥
संत हे सज्जनासी तारक | आधी व्याधी आरिष्ट हारक |
हिनदिनांसी ही उद्धारक | वात्सल्ये रुपक माऊलीपरी ॥८॥
अज्ञासी बनवीती सुज्ञ । मुर्खासीही करवीती तज्ञ |
चालवी भक्ती ज्ञान यज्ञ । सदा सर्वदा-यथायोग्य ॥९॥
संतांचे ते सहजोच्यार | वेदार्थाचेची मौलीक तुषार |
सु-स्पष्ट जाणती जाणकार । सेवाधारी – निष्ठावंत ॥१०॥
ऐशिया श्रेष्ठांचीच श्रेष्ठता । तया वदती यथार्थ योग्यता |
योग्यते वरुनी ही जनता | मानवीय धर्म – आचरी ॥११॥
अती उच्चांक मानव जन्माचा | श्रेष्ठावतार “’परमहंसाचा”।
तया कृपे विना कुणा भक्तांचा | उद्धार कधी – नाही हो ॥१२॥
तेची चालते बोलते दैवत । तया वदती संत भगवंत |
आविष्कार तो तोची साक्षात | मानव रुपे, साकार…॥१३॥
मानवास्तव मानव रुपाने | भगवंताचेची अवतरणे |
केव्हढा उपकार नारायणे । केला आज आम्हावरी ॥१४॥
विरळ जरी प्रकटले येथे । सर्वत्र तरी एकवटले वाटे ।
चालवीती परमार्थ सु-पंथे | पायस्थासी -यथाकाले ॥१५॥
जेथे नांदती तेथे तिर्थक्षेत्र । जे जे बोलीती ते ते शास्त्र ।
तयांचे नाम ही भारी पवित्र | उध्दारक -भक्तांसी ॥१६॥
अहो, सांप्रत “करजगांव” खेडे | गाजतसे जया किर्ती मुळे ।
तया, *’देविदास बाबांचे हे थोडे”। नित्यस्मरणीय आख्यान ॥१७॥
काटूजी हिरवे भाग्यवंत पिता | सौभाग्यशाली शांताबाई माता ।
कुणबी पाटील सदगृहस्ता | कृतकृत्यता लाभ ॥१८॥
शके अठराशे एक्याणशी थोर । होते ते विक्रम नाम संवत्सर ।
तये श्रेष्ठ दिनी शनिवार । शनी जयंतीचा होता बघा ॥१९॥
तया वैशाख वद्य अमावस्येशी | रोहिणी नक्षत्र वृषभ राशीसी |
करजगांव पावन भूमीशी | देविदास बाबा प्रगटले ॥२०॥
ख्रिस्ताब्द एकोणविससेसी | तारीख सहा जून मासि |
निश् चित एकोणसाठ सालासी | देवीदास जन्मला ॥२१॥
करजगाव जन्मभूमी पवित्र | शुभारंभी पाऊले ठेवी सुपात्र |
जेथे आनंदी आनंद सर्वत्र । नांदू लागला – सदैव ॥२२॥
बघावया येती सुवासिनी | प्रभू नाम गुंजती पक्षीणी |
फळे फुलेही बहु बहरुनी । सुगंध, दरवळवी ॥२३॥
भारी सोत्साह वाटे नारी नरा। घरोघरी जैसा दिवाळी दसरा ।
रांगोळ्या रेखिती दारा । घराघरा पुढती ॥।२४॥
शांताआईची बघुनिया भक्ती | आला तिचेच्या उदर संपुष्टी |
की परंपावन पान्ह्यासाठी | तान्हूला हा जाहला ॥२५॥
आईचे करी पाळणा सुतळी | तिची परिवाराते सांभाळी |
ऐसी थोर मातेची पातळी | सहस्त्रादी संताहुनीही ॥२६॥
माय लेकुराची भारी माया | मज शब्द नसे लिहावया |
जाणकार तोची जाणे ही माया | जयाची ते या-अनुभवी ॥२७॥
तीनही लोकीचा स्वामी जरी | मातेविना तोही भिकारी |
मरु नये कुण्याही अवसरी | माय-माऊली कुणाचीही ॥।२८॥
तान्हुल्या शिवाय माय ना राही । की, माय विना बाळ व्याकुळ होयी |
जणू समरसता अव्दैत ही । माय लेकुराची ॥।२९॥
देवीदास बाळा गुंतवुणी घरी | माऊली आपुले घरकाम करी |
नियतीचा क्रुर खेळ ते अवसरी | बघता बघता संपला ॥३०॥
पाणी भरता, भरताची माता | विहीरीतची पडीयेली आता |
अनाथची करुनी बाळ संता | मृत्यूपंथा गेली पां ॥३१॥
की, साधकाअंगी यावया उपरती | स्व माय ची केलीसे मुठ माती ।
की, माते शिवाय पोरका कीती | असमर्थ समर्थही ॥३२॥
आता उदासले सारे तन मन । इथे तिथे फिरती भन भन ।
आधारही ना देई कोणी जन | म्हणूनि वन वन भ्रमंती ॥३३॥
गायी, हरिणी, रोहीणींचा पान्हा | मातृवात्सल्ये हा देवीदास तान्हा |
प्रापण करीतसे पुन्हा पुन्हा | राना वना वेळो वेळी ॥३४॥
अथवा, जयासी कुणी नाही | तयाचा योगक्षेम कोण वाही |
तोची ”तो”’ सांभाळी सर्वदाही | परम माऊली, ईश्वरी ॥३५॥
यदा कदा रात्री अपरात्री ही | कुठे पडक्या पडवीसीही |
सवे, कुत्र्यांच्या झुंडी राही । चिल्यापिल्या – समवेत ॥।३६॥
तिथेची बकरीचे पाडस ही | आषिक, देविदास बालक ही |
दोघांसी ही आपुला पान्हा देई । कुत्री एक-पिल्लेवाली ॥३७॥
जैसा,तिथेचा हा तान्हुला बाळ | कधी “नच होऊ देयी आबाळ ।
माऊली जैसी करी प्रतिपाळ | यथाकाळ – बाळ संगोपन ॥३८॥
पशूपक्षीय भाषा, भाषण | सु-स्पष्ट कळे, देवीदासा परीपूर्ण |
जो जाणे सजीवांचे मन । तेथे न्युन-कांही नाही ॥३९॥
तरनोळी, मानकी, कोलवाई | इरथळ, बोथ भुलाई, लोही |
मन माने तिकडेची राही । वैराग्याने दिवस-रात्र ॥४०॥
कधी, धामणगांव देव | तर कधी शिरडी, शेगांव ।
संत दर्शनी धरुनी हाव | गावो-गावं जात असे ॥४१॥।
श्री पुंडलीका भेटी गोरेगावी । सोमवारी वारी नियमे होयी ।
वैराग्याने सततची राही । आवड निवड नाही – काही काही ॥४२॥
भक्ती ज्ञान, वैराग्य जुळवी | संत स्नेहे संतची स्वभावी |
देव भक्त विभक्त नाही । ऐसे अनुभवी – अनुभवती ॥४३॥
आता जिथे राहती ते श्रीक्षेत्र । गाती वदती ते भावी संकेत ।
प्रत्येकाचे अंतरीचा भावार्थ | सुस्पष्ट – कळतसे…॥४४॥
गावोगावी रानोमाळासी | जावू लागले खेड्यापाड्यासी |
शहरो शहरी नागरी वस्तीसी | भक्त उद्घारासी कळवळयाने ॥४५॥
कधी भुलाईच्या निर्जन वनी | जिथे व्याघ्र, सर्प, विंचू, प्राणी ।
तया ठायी हा एकाग्र होवूनी | ईशचिंतनी निमग्नण ॥४६॥
थंडी, उन, पावसातही | तिथल्या तिथची बैसूनी राही ।
भूक, तहानेचीही पर्वा नाही । वैराग्यवंत देविदासा ॥४७॥।
वनौपज आणिक वनस्पती | उपजीवीकेसी वापरती ।
तृष्णेसी निर्झरोदक ही घेती । लाभेल – तेथिचे ॥४८॥
कधी कुण्या मंदीरी, सभामंडपी | बहुदा हौदावरही पाणी पी |
शारिरिक कष्ट सोसी तथापी | मागणे कदापी कुणा नसे ॥४९॥
ऐसीया कठोर साधनेची । पुर्णावस्था लाभली साची |
म्हणूनी भाविक जनासी | अनूभुती येत असे ॥५०॥
परमहंस पुष्प फुलले | चैतन्य सुगंधे नटले |
जन मन प्रसन्न जाहले | यथाकाळी – यथोचित ॥५१॥
आता अशक्य तेही शक्य होई । वा, असाध्य ही सारे साध्य पाही |
झाकलीयाने झाकणार नाही | शक्तिविदेही -संताची ॥५२॥
दिव्यतेचा हाची आविष्कार | कुणी सांगती साक्षात्कार ।
कुणा गमे महदाश्चर्य थोर | परमहंस-देविदासाचे ॥५३॥
केंवळ नामोचार करुनी | संकटारिष्ट जाई टळूनी |
भक्त मनोगत जानुनी | परीपुर्ती – होत असे… ॥५४॥
कुणाची टळवी आपत्ती | कुणा लाभवी संतती, संपत्ती |
कुणासी ऐहीक, पारमार्थीक स्थिती । परीपूर्ती- बाबाकृपे ॥५५॥
संत देविदासाचे संकल्प मात्रे । चालती आता सर्व सु-सुत्रे ।
मनोकामने नुसार पवित्रे | विविध सत्रे – यथोचित ॥५६॥
भाविक आता शोधतची राहे | महाराज मात्र भ्रमंती जाये |
एका स्थानी कधीही नोहे | वास्तव्य-कायम ॥५७॥
भारी कष्टा अंती गवसती । भक्त गण अत्यानंदती |
कष्टाविना नाही काही वदती | साध्य साधन भक्ता ॥५८॥
भक्त प्रतिपालक समर्थ | पुरविती भक्तांचे आर्त |
तयासाठी सतत दिनरात | चिंतनात – चिंताग्रस्त ॥५९॥
जो सर्वदा देवीदासा ध्यासी । तोही तयांच्या पाठीसी राही ।
म्हणूणी तत्परतेने होयी | अशक्यतेही | शक्य सर्व ॥६०॥
एकदा मांगकिन्ही गावासी | आमुचिया प्रवचन सप्ताहासी |
देवीदास येवुनीया सोहळ्यासी | सोत्साहासी -वाढविले ॥६१॥
तैसीच तेलगव्हाण गावी । सांभाजी, विष्णुजी देवीदासही ।
पुंडलीक बाबा बंधु नारायणजी ही । प्रामुख्याने आले होते ॥६२॥
असीया, संताचे स्नेह, सहकार्य । हेची माझे जीवनाचे धैर्य ।
अन्यथा साहित्य सेवेचे कार्य | शक्य नव्हते – पंढरीदासा ॥६३॥
यथार्थिचे हा दास असमर्थ | परी उचित समर्थांचेची सामर्थ्य ।
म्हणूनचि आजपर्यंत । संत सेवा साधली ॥६४॥
एवंम् संतापायी पंढरीशभावे । दास पंढरीश शरणांगत राहे ।
तोची तो यथार्थ वाली आहे | भक्तासी पाहे-कृपादृष्टी ॥६५॥
संतलिलामृत आवडी । अमरत्व तया मानव कुळी |
एवंम भजावे वेळोवेळी | देविदास-बाबांसी ॥६६॥
श्रवण, मनन, निजध्यासे । आळवावे देविदासा साहसे |
मग पाठबळ तयाचेची असे | भक्तालागी – सहयोगी ॥६७॥
संत हेची देवांचे ही देव । तेणे गुणेची आध्यात्मिक वैभव |
अन्यथा कुणाही नसे चेव | ईश्वरीय – कार्यासी ॥६८॥
म्हणुनिया तेची सर्वश्री समर्थ | तयापुढे देवत्वही असमर्थ |
एकमेवाव्दितीय सर्वश्रेष्ठ | संत, सत्पुरुषची सर्वदा ॥६९॥
एवंम, देविदास कृपा आधारे | ईष्ट उद्धीष्ट साधुया सारे |
मानव जन्माचे सार्थक त्वरे | येची अवसरे-साधावे ॥७०॥
अती सुलभ संधी लाभलेली । आळसाने सहज दवडीली |
अंती पशचातापाची पाळी आली । ऐसे नको-व्हावया ॥७१॥
संताची जाज्वल्य चेतनाशक्ती | असमर्थांसीही सामर्थ्य देती ।
जैसे निर्जिवा सजीव करिती | संजीवनी – प्रतापे ॥७२॥
स्वामी भास्करानंदे आळविले । यथायोग्य यतीत्व मिळविले |
आणि करविरी स्थिरावले | सांप्रत – सुखरुप ॥७३॥
आता दुर्लभची दर्शन । तरीही भाविक करी शोधन |
करजगांवी आणविले रानातून | चुलतबंधू-दत्ताने ॥७४॥
हा चुलत बंधु दत्ता हिरवे भजनी रंगला भक्तीभावे |
भक्तानुभवही रोज नवे नवे | स्वानुभवे अनुभवती ॥७५॥
एकदा सांडाने आपटी दिली । डोळीयासी शिंग लागली ।
देविदास कृपे सुखरुप झाली | भक्ती जडली-तयागुणे ॥७६॥
आता भाविक बंधू भगिनिंशी । भक्ती आवडी देवीदासांची |
सेवाधारी सेवाव्रती भक्तांसी | शुभ पर्वणी -लाभली ॥७७॥
कलाबाई तैश्या शिलाबाई | हिरवे इंदीराही बाई ।
सुखदेवजी हिरवेही राही । व्यवस्थापना-व्यवस्थित ॥७८॥
रामकृष्णा राऊत टेलर | सेवाधारी जिवनभर ।
भजन, गायनाचा गजर । तया योगे – होत असे ॥७९॥
आता भाविकांची वर्दळ | वाढीसी लागली वेळोवेळ |
अभयदानी गंगोत्री प्रांजळ | करजगांवी – उगमावली ॥८०॥
धन्य स्थान महात्म्य थोर । परम पावन हा परिसर ।
धामणगांव मांगकिन्ही सुंदर | माणकी कोलवाई-तिर्थक्षेत्रे ॥८१॥
सजगकांही गावकरी | जन्मोत्सवा तयारी करी |
जाहीर करिताची सारी । भक्त मंडळी-येत असे ॥८२॥
भजन, किर्तन, प्रवचन | प्राधान्ये संत संमेलन |
महाप्रसाद नगर भोजन । भाविक संपूर्ण-करित असे ॥८३॥
कोल्हापूरचे भास्करानंद | सवे घेवून संत वृंद ।
संत सम्मेलनाचा आनंद | वाढदिवसी-आणिती ॥८४॥
कैलासबाबा वाशिमचे । जीवनबाबा मोहगव्हाणचे ।
श्याम बाबा मंगरुळचे । अकोल्याचे दिपकबाबाही ॥८५॥
गंगा माता आडोळीच्या | स्वाती माता झोडग्याच्या |
सखु माता राजाकिन्हीच्या | मुंगसाआई-आदी ॥८६॥
संतदर्शन अभयदान । तेणे, प्रसन्नता समाधान|
तिर्थ क्षेत्रची गमे महान । श्रीक्षेत्र-करजगांव ॥८७॥
सकलिकांचे ओजतेजही | सहजा सहजी संपन्नता ही |
वृध्दींगत आता होयी । संतकृपे -सांप्रत ॥८८॥
भारी, आधी, व्याधी पळे । घोर संकटेही टळे ।
इच्छीत कार्येही जुळे | परमहंस – देविदासा भजता ॥८९॥
बोदेगांवी श्यामसुंदरा लागुनी | वाचविले मोठ्या अपघातातूनी |
तोही जाहला अत्यंत ऋणी | महाराजांचा ॥९०॥
नागपूरचे नितीन सिंगतवार | कारंजाचे लक्ष्मण मुळतकर |
तैसे अविनाश खेडकर | मारोती तुपोनेही सदभक्त ॥९१॥
दादाराव काळे मसला गावात। विहीरीसी पडीयले अकस्मात।
इंजीनही पडले छातीवरतं । मरणोत्मुखातुन वाचविले तया ॥९२॥
श्वानविषाच्या तावडीतूनी | वाचविले गजानना लागुनी |
मिराबाई इंगळे झाली ऋणी | आजीवन भक्तीमती-कारंजा निवासी। ॥९३॥
कोमल जयस्वाल | तैशाची धनश्रीही पाटील।
इंझ्याचा नाखले परिवार सकल | संतसेवा विपुल-करित असे ॥९४॥
श्यामसुंदर जयस्वाल बोदेगावीचे तैसे दत्तात्रय फुंदे रामगावीचे |
लताबाई मनोरे सदभक्त राऊत | संत देविदासांचे सेवाधारी ॥९५॥
विनोदभाऊ चांभारे भक्त | बंडुभाऊ सांगलवाडीत |
लताबाई मनोरे सदभक्त । राऊत रुखमाबाई ॥९६॥
ऐसा हा देविदास दयाळू | भक्ताचा करीतो प्रति पाळु |
म्हणुनी करंजग्रामी लागले वळू! संतभक्त-भारतीय ॥९७॥
कर्णाटक बेंगलोरचे विश्वविख्यात | श्री विद्याशंकर भारती प्रख्यात |
जगतगुरु शंकराचार्य कुंडलस्थ। शृंगेरी पिठाधिनस्थ ॥९८॥
तयांनीही करजग्रामी सन्मानीले। आणि श्रीफळ देवूनी वरदान घेतले |
गौरक्षणार्थ जागेस्तव भले।मग तैसेची घडले-यथावेळे ॥९९॥
श्रीरामपुरचे शिवचिदंबर भक्त | उमाकांत कुळकर्णी विरक्त |
देवीदास कृपे यथार्थ अनुभव घेतात | संभाव्य गौरक्षणाचा ॥१००॥
ऐसे थोर थोर भेटुनी जायी .। देविदासांची महती गायी।
जो तो सदा सर्वदा गौरवी | सांगुनी थोरवी बाबांची ॥१०१॥
श्रीक्षेत्र धामणगांवासी | देवांचीया मुख्य दरबारासी |
गद्य चरित्र प्रकाशनासी | महाराज -आले होते ॥१०२॥
स्वामी भास्करानंद सरस्वती | तयांचीती श्रेष्ठ साहित्यकृती ।
धामणगांवचे मुंगसाजी देव, अती प्रसिद्ध जाहले ॥१०३॥
तया ग्रंथ प्रकाशनासाठी। देविदास बाबा आवर्जुन येती |
शुभ स्वहस्ते विमोचन करिती | संत साक्षीने तेधवा ॥१०४॥
बाल खटेश्वर शेलू ब्राम्हणवाड्याचे | दिपकबाबाही अकोल्याचे |
गंगामाता, मुंगसाईचे | प्रमुख उपस्थितीसी ॥१०५॥
तैशा साध्वी अमरानंदी भारती | साधु संत परमहंस भक्त किती |
अविस्मरणीय प्रकाशनासाठी | आले होते-येथे पां ॥१०६॥
करवीर क्षेत्रीचे भास्करानंद | तयांनी घडविला हा आनंद |
देविदासा परमानंद | आनंदी आनंद-जाहला ॥१०७॥
ऐसे सोत्साही भारी सोहळे | होत असे संत देविदासामुळे |
वैदर्भीय वैभवची वेगळे | उपस्थीता कळे, सांप्रत ॥१०८॥
हिची संतांची सदा सहजता । तेणे सुखावे अवघी जनता ।
अंतर्बाह्य समाधानाकरिता | संतकृपा-आवश्यक ॥।१०९॥
आळसांची उत्साहावृद्धी | दारिद्रीयांसी सहज समृद्धी |
व्यसनीयांसी व्यसनमुक्ती आदी | योग्यता साधी-कृपेमुळे ।।११०॥
निरक्षरांसी साक्षरता । अज्ञानीयांसी सुसुज्ञता ।
अती, दुर्जनांसीही सज्जनता । कृपा होता-यथायोग्य ॥१११॥
ऐहीक वा – पारमार्थीक प्रगति । संत कृपेची लाभे, सर्वोन्नती ।
लाभा विणे ही, सहानूभूती सर्वदा ती-इथे,पां ॥११२॥
थोर संकटांची गुंता गुंत । प्रार्थीता-वारीती संत, भगवंत ।
तया विना कृपावंत | तिन्ही काळात-नाही नाही ॥११३॥
तेजाचाही होता उदय | सकाळ दूपार सांज होय |
क्रमे, हाची, तो प्रत्यय | जिवनी ही, होय-प्रत्यक्ष ॥११४॥
म्हणूनीया, चाहूलही लागे | पैलपार जाणे, लागे लगबगे |
तेची, सत्त्य वदू लागे | महाराज सर्वदा ॥११५॥
देह उसनवार पाहूणा | देणे परतूनी तयांना |
कोण पुसतो, येथे कुणा। सकलांना-जाणे असे ॥११६॥
वयाचिये एकोणसाठव्या वर्षासी। वदती,यंदा,जाणेची असे, निज धामासी ।
कुणी रोखू नका आम्हासी । जीव लगासी-भेटावया ॥११७॥
हळूहळू नश्वर देहाची सुदृढता। खंगू लागली, बघता बघता |
सर्वांगासी अशक्तता | व्यापकता-व्यापीयली ॥११८॥
कुणी, घेवूनी जायी-कारंजासी । तेथुनीही पुढे, नागपूरासी |
योग्य औषधोपचारासी | आशेने-भारी असे ॥११९॥
अंतीम सत्य, जाणीयले | तदा, तज्ञांनीही, हातची टेकविले |
मग-महाराज उद्गारले | तीन तारखेले-जाणे मजसी ॥१२०॥
निर्वाणाचा, काळ, वेळही । मरणा पूर्विच जिवेदीती सर्वही ।
ईच्छामरणी, परमहंस विदेही | संकेतही-भक्तालागी ॥१२१॥
मध्येची घेतली काळाने उडी,अकस्मातची दुःखाश्रृतची,गेले ओसंडून।
समस्त वदे झाले निर्वाण। गेले गेले सोडून-आपणासी ॥१२२॥
मग करीता भक्त आकांत | ऊठोनिया बैसे, अकस्मात |
निर्वाणीचा संदेशही कृपावंत | भक्तापर्यंत देई ॥१२३॥
ईसवीसन विससेशी। निश्चित अठरा,सालासी’मे महिन्याचे तीन तारखेसी।
गुरुवार दिवसी-निज धामासी महाराज गेले, पां.॥१२४॥
सकाळी , अकरा वाजूनी | नक्की, दहा मिनिटांनी ।
श्री देविदास महाराजांनी | पार्थिवा लागूनी सोडीयले ॥१२५॥
शालीवाहन शके, एकोनविसशेसी | निश् चित चाळीसाव्या, संवत्सरासी |
वैशाख कृष्ण एकदंत संकष्टी चतुर्थीसी | देविदास राजयासी- निर्वाण ॥१२६॥
शिव शक-तीनशे चौरेचाळासी | वयाचे- एकोणसाठव्या वर्षासी।
सार्थकी देहासी | निज धामासी-गमना पां. ॥१२७॥
अजर अमर महाराज | सकलांसी वदती सहजासहज |
सर्वदा चिंतावे मज | समाधीतूनिया तुम्हास-पावतो मी ॥१२८॥
शक्यतेनुसार सेवाभक्ती | संतसेवा घडावी यथास्थिती |
पारायणाने ही पारायणार्थी | देविदासाप्रती-आवडो ॥१२९॥
श्रोतया वक्तया लागी आता | अभयदान द्यावे देविदास नाथा |
साहित्य सेवेची परिपूर्तता । जैसी केली-तैसी पां ॥१३०॥
श्री क्षेत्र करजगांव नगरी । प्रत्यक्ष श्री देविदास समाधी समोरी |
दास पंढरीश अंतिम लिखान करी । प्रस्तुत-स्तोत्राचे ॥।१३१॥
प्रस्तूत ओवी भाव पुष्पांजली | अर्पुनी देविदास पाऊली |
भक्त जणा कृपा दृष्टी भली | अपेक्षी-अपेक्षा दास पंढरी ॥१३२॥
नच व्हावी कोणाची उपेक्षा। हिच विनम्र प्रार्थना प्रतिक्षा |
एवम् संत सेवा मार्गी दिक्षा । सदा सर्वदा लाभावी ॥१३३॥
सर्वत्र आयु-आरोग्य लाभो | जगती देविदास भक्त शोभो |
हिच पदांबुजी प्रार्थना प्रभो | सदिच्छा दासाची ॥१३४॥
ईति श्री देविदास बाबा स्तोत्र | भक्तजनांचे पुरवो ईच्छित |
समाधान सुख देवो सदा सर्वत्र | हिच सदिच्छा दास पंढरीशाची ॥१३५॥
शांती पाठ
ॐ.पूर्ण मद: पूर्ण मीदम – पूर्णत पूर्ण मुदच्यते !
पूर्णस्य पूर्ण मादाय, पूर्ण मेवावशिष्यते
ओम शांती: || शांती:।। शांती:।।